औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी आपल्या मित्रांसह राजू पटेल आणि प्रसिद्ध थोरे यांच्यासोबत नारळ खाण्यासाठी शेतात गेला होता. रात्री उशिरापर्यंत रितेश घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही.
रविवारी (ता. १२) शोध सुरू असताना रितेशसोबत शेतात गेलेल्या राजू पटेलला विचारणा करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने घटनेचा तपशील उघड केला. राजूने सांगितले की, नारळ खाल्ल्यानंतर परत येत असताना रितेश आणि प्रसिद्ध थोरे यांच्यात किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात प्रसिद्धने धारदार लोखंडी विळ्याने रितेशवर हल्ला केला.
सोयाबीन गुळीत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न – खून केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी प्रसिद्धने रितेशचे प्रेत विजया गिरी यांच्या शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरले आणि त्यावर गुळी टाकली. रितेशच्या कुटुंबीयांनी गुळी बाजूला सारून पाहिले असता नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर, मानेवर आणि इतर भागांवर वार झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
सदर घटनेची माहिती मिळताच भादा पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, शाळकरी मुलांच्या वादातून असा गंभीर गुन्हा घडल्याने खळबळ उडाली असून गुन्हेगारी आता शाळकरी मुलांपर्यंत पोचल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.