चिकाटी, कठोर परिश्रम, आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील घारगावच्या डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या निकालात पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत उपजिल्हाधिकारी पदावर यशस्वी झेप घेतली आहे. अवघ्या २९ वर्षांच्या महेश यांनी आपल्या या यशाने कळंब तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.(MPSC)
महेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत तर माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथील गुरुदेव विद्यालयात झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण योगेश्वरी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर, त्यांनी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. परंतु, वडिलांच्या इच्छेनुसार ‘एमडी’ करण्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा मार्ग निवडला.(MPSC Result)
महेश यांचे यश त्यांचा कठोर अभ्यास, वेळेचे अचूक नियोजन आणि परिवाराच्या समर्थनेचे फलित आहे. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी सातत्याने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात ५९४ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. महेश यांचे वडील अरविंद घाटुळे, आई मिरा घाटुळे, आणि विवाहित बहीण मंजूषा यांचे योगदान त्यांच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे.(Mpsc)
त्यांच्या या प्रेरणादायी यशामुळे अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिशा आणि धैर्य मिळेल.