पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील अखिल म्हसोबा नगर गणेश मित्र मंडळ, जय जिजाऊ महिला ग्रामसंघ, ढेरंगे वस्ती येथील बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मदतीचा मायेचा हात दिला आहे. आंदोलक बांधवांना जेवण आणि पाणी कमी पडू नये यासाठी त्यांनी एक हजार चपात्या, लोणची, चटण्या, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या मुंबईकडे रवाना केल्या आहेत.
आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून कोरेगाव भीमा येथील महिलांनी या मदतकार्यात मोठा सहभाग घेतला. त्यांनी मोठ्या उत्साहाने चपात्या, धपाटी, दसमी, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून मुंबईला पाठवले. या मदतीतून मराठा समाजामध्ये असलेली एकी आणि एकमेकांबद्दलची भावना दिसून येते.
मुंबईतील आंदोलनासाठी गेलेल्या बांधवांना वेळेवर जेवण मिळावे, हा या मदतकार्याचा मुख्य उद्देश होता. कोरेगाव भीमातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मदतीमुळे आंदोलकांची ऊर्जा कायम राहील आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना एक मोठा आधार मिळाला आहे.