सणसवाडी (ता. शिरूर) कष्टकरी, प्रगतशील शेतकरी आणि गाडा मालक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, तसेच कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळावर मालक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या नियुक्तीने उद्योगनगरीतील कामगार व मालक यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी एक समर्थ आवाज मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
कोरोना काळात ठरले आधारस्तंभ – कोरोना महामारीच्या कठीण काळात बाबासाहेब दरेकर यांनी केलेल्या कार्याची मोठी दखल घेण्यात आली आहे. अनेक कामगारांना मदतीची गरज असताना त्यांनी त्यांना अन्न, निवारा आणि गावी परत जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे ते खऱ्या अर्थाने ‘कामगारांचे आधारस्तंभ’ बनले होते. कोरोना काळात कुटुंबाचा आधार असलेल्या कुटुंब प्रमुख कामगाराचे निधन झाल्यावर शासनाची मदत मिळवून देण्यासाठी मोलाचे काम केले असून राज्य शासनाने त्यांना या महत्त्वाच्या पदावर संधी दिली आहे.
दरेकर यांच्या नियुक्तीमुळे सणसवाडी आणि शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे कामगार-मालक यांच्यात सुसंवाद साधणारा आणि औद्योगिक विकासाला गती देणारा प्रतिनिधी मिळाल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.या निवडीने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून दरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल राज्य शासनाचे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युती सरकारचे आभार मानले. “पक्षासाठी अनेक वर्षांच्या एकनिष्ठ कामाचे हे फळ असून कामगार आणि उद्योगजगत या दोन्हीच्या हितासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.कामगार व उद्योजक यांच्यात संवाद होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – बाबासाहेब दरेकर, नवनियुक्त सदस्य महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ