नरेश्वर तालीमीतील मल्ल राज्य स्तरासाठी सज्ज
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला नवी आशा व प्रेरणा ठरत आहे कोरेगाव भीमा येथील नरेश्वर तालीम याचे कारण म्हणजे मनस्वी पांढरे विभागीय स्तरावर सुवर्णपदकासह राज्य स्पर्धेसाठी पात्र जिद्द, मेहनत आणि गुरुजनांवर विश्वास ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते, हेच मनस्वी सोमा पांढरे या नवोदित मल्ल कन्येने सिद्ध केले आहे. लोणीकंद (ता. हवेली) येथील होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या मनस्वीने नुकत्याच झालेल्या विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत ४६ किलो वजन गटात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) पटकावले. तिच्या या देदीप्यमान यशाने तिची थेट राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मनस्वीच्या या यशाचा खरा आधार आहे, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध नरेश्वर तालीम. प्रशिक्षक भांडवलकर सर यांच्या अत्यंत कुशल आणि कठोर मार्गदर्शनाखाली ती नियमितपणे सराव करते. तालीम आणि शाळेच्या अभ्यासाचा अचूक समन्वय साधत मनस्वीने हे यश मिळवले आहे, जे ग्रामीण भागातील इतर खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणास्रोत ठरेल.
विभागीय स्पर्धेतील तिचा उत्कृष्ट खेळ, तंत्रशुद्धता आणि प्रतिस्पर्धकांवर सहज मिळवलेला विजय पाहता, ती आता महाराष्ट्राच्या कुस्तीच्या नकाशावर आपले नाव कोरणार हे निश्चित आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही मनस्वी सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज झाली असून, नरेश्वर तालमीच्या परंपरेला साजेसा खेळ ती करेल, यात शंका नाही.
मनस्वीच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लीली पारंबी, क्रीडाशिक्षक प्रताप फडतरे आणि क्रीडा शिक्षिका कल्पना सुतळे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. नरेश्वर तालमीचा लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.