विजय स्तंभाला लाखो भीम अनुयायांचा सलाम…निळ्या आभाळी, निळे निशाण, मुखी जय भीम जय भीम..

Swarajyatimesnews

आंबेडकरी अनुयायांच्या हातात भारतीय राज्य घटना, बुद्धांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर पुस्तक, डॉ बाबासाहेबांचा फोटो , बुद्धांचा फोटो

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) निळ्या आभाळी डौलाने डोलणारे निळे निशाण, बुध्दांच्या आणि डॉ बाबासाहेबांच्या विचारांनी सशक्त झालेले मनगट आणि विचार आणि मुखातून बाहेर पडणारे स्वाभिमानी जय भीम जय भिमचा  जयघोष यामुळे कोरेगाव भिमा,पेरणे परिसर दुमदुमून गेला होता. विजय स्तंभ व तुळापूर , वढू येथे लाखोंच्या जनसमुदायाने मानवंदना व अभिवादन केले. आंबेडकरी अनुयायांनी घरी जाताना आंबेडकरी अनुयायांच्या हातात भारतीय राज्य घटना, बुद्धांचे किंवा इतर पुस्तक, बाबासाहेबांचा फोटो व बुद्धांचा फोटो नेले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका ,संघटित व्हा याचे जणू प्रतीक दिसून आले.यावेळी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या नियोजनामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम शांततेच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार सुनेत्रा पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, संजय बनसोडे, नितीन राऊत, राजकुमार बडोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लीकन पिपल पार्टि जोगेंद्र कावडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार प्रकाश गजभिये  यांच्यासह अनेकण्यावरांनी विजय स्तंभास अभिवादन केले.

देशभरातून उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , छत्तीसगड, गुजरात , तेलंगना, हरियाना, कर्नाटकासह यावर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभासमोर नतमस्तक झाला. यावेळी भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना, आरपीआय, भारतीय बौध्द महासभा, दलीत पँथर, यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

शाहिरी जलसे, भीम गीतांनी प्रबोधन – यावेळी जय भीमचा जयघोष, ठिकठिकाणी बाबासाहेब व माता रमाबाई यांच्या गाण्यासह भीम गीते, शाहिरी जलसे यांच्या माध्यमातुन डॉ बाबासाहेब यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत अनुयायांमध्ये उत्साहाचे वातरण निर्माण झाले होते. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड आघात घालणारी व जातीयवादावर टीका करणारी अनेक गाणी गायली जात असताना अनुयायांनी उत्स्फूर्त दाद दिली.  मराठवाडा, विदर्भ, अहिल्यादेवी नगर, ठाणे येथून आलेल्या कलाकारांनी रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली सावलीत बसून प्रबोधनात्मक व भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व  माता रमाबाई यांचा त्याग याविषयी हृदयस्पर्शी गाणी गायली गेल्याने अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करत कलाकारांना प्रोत्साहन दिले.

विजयस्तंभास अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय –  कोरेगाव भीमा येथे मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेला गर्दीचा ओघ बुधवारी पहाटेपासूनच वाढायला सुरुवात झाली होती. अंदाजे १५ लाख लोक अभिवादनासाठी देशभरातून आले होते.

महार रेजिमेंटची सलामीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजीमेंटची स्थापना करण्याची घोषणा स्तंभावरुनच केली होती. या घटनेच्या कृतज्ञता म्हणूण दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजीमेंटच्या निवृत्त जवानांच्यावतीने मानवंदना देण्यात येत असते. यावर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.

नागरिकांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष – कोरेगाव भीमा व विजयस्तंभाजवळ पोलीस नियंत्रण कक्ष उभारल्यामुळे गर्दित हरवले-सापडले यासाठी चांगला उपयोग होत होता.अनेक लहान मुले , मोबाईल , पाकिट सापडलेली या कक्षात पोलीस ज्यांचे आहेत त्यांना देत होती. तसेच समता सैनिक दलाचे २ हजार जवान यांच्यासह शांतीदुत देखील गर्दिला दिशादर्शक व मदत करण्यास उपयोगी पडत होते.

एनडीआरएफचे जवान तैनात –  कोरेगाव भीमा येथिल पुणे-नगर महामार्गावरील दुतर्फा असलेल्या पुलावर मोठी गर्दि झाल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफचे जवान तैणात करण्यात आले असुन ते सतत भीमा नदीपात्रातून आपल्या पाणीबुडीतुन लक्ष ठेवण्यात आले.

सुसज्ज वाहन पार्किंग व्यवस्था – हवेली तालुक्यातील लोणीकंद व शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे सुसज्ज व सर्व व्यवस्था असलेली सुसज्ज सुरक्षित वाहन पार्किंग व्यवस्था असल्याने अनुयायांना सोयीस्कर ठरले तर वाहतुकीसाठी पि एम टी च्या ६३० बस असल्याने अनुयायांना प्रवास सोयीस्कर ठरला यावेळी तुळापूर येथे भित दिली तर शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छञपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले तर गोविंद गोपाळ यांच्या येथेही नतमस्तक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!