कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याचे २०५ वे वर्ष तर भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी जय स्तंभास विशेष अशी सजावट करण्यात येणार असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय स्तंभावर उजाळा देण्यात येणार असून जय स्तंभावर पंचशीलाच्या चौकटित भारतीय संविधानाचा गौरवशाली सन्मान करण्यात येणार असून संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त जय स्तंभावर संविधानाचे ,बौद्ध धर्माचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे व कार्याचे विशेष स्मरण करत गौरवशाली इतिहासाला उजाळा देत समतेचा संदेश घेऊन झळकणार डॉ. बाबासाहेबांचा निळा ध्वज, अशोक चक्र, जय भीम अशी नेत्रदीपक आकर्षक व ऐतिहासिक उजाळा देणारी सजावट करण्यात येणार आहे
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक आणि समतेचा संदेश देणारी एक अद्वितीय सजावट करण्यात आली आहे. ही ऐतिहासिक सजावट रिपब्लिकन विध्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांच्या संकल्पनेतून,कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या वतीने आणि बार्टी महासंचालक सुनिल वारे व निबंधक इंदिरा आस्वार यांच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जय स्तंभास ऐतिहासिक व आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी ३०५ व्या शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभ एका अनोख्या स्वरूपात झळकणार आहे. पंचशीलाच्या चौकटीत भारतीय संविधानाची उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य तेलचित्र, आणि जय भीम घोषवाक्यासह निळ्या रंगाचा ध्वज या सजावटीचा भाग आहे. ध्वजावर पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असेल, जो समतेचे आणि धम्माच्या विचारांचे प्रतीक आहे.
कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, आणि रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांनी या सजावटीसाठी संकल्पना मांडली असून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष व उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.
भारतीय संविधानाचा गौरव – भारताचे संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याची रचना समता, न्याय आणि बंधुतेच्या तत्वांवर केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा गौरवशाली इतिहास विजय स्तंभाच्या सजावटीतून प्रकट होणार असून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संविधानाचा गौरवशाली इतिहास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
निळा ध्वज: आंबेडकरी अस्मितेचे प्रतीक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या लढ्याचे आणि आंबेडकरी विचारांचे प्रतीक असलेला निळा ध्वज यंदाच्या सजावटीचा मुख्य भाग आहे. समतेचे प्रतीक असलेला हा ध्वज धम्मचक्र आणि जय भीम घोषवाक्याने सुशोभित करण्यात आला आहे.
विजय स्तंभाच्या सजावटीमागील उद्देश – या वर्षीच्या विजय स्तंभाची सजावट भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचा आणि डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा जागर करणारी आहे. इतिहासाचे स्मरण आणि समतेचा संदेश घेऊन कोरेगाव भीमा विजय स्तंभ देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शौर्यदिनासाठी अनोखी भेट – भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ही सजावट पाहण्यासाठी लाखो लोक शौर्यदिन साजरा करण्यासाठी येतील त्यांना हा ऐतिहासिक क्षण प्रत्येकाला अभिमानाने भरून टाकणारा ठरणार आहे.
जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे, जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा गौरवशाली इतिहास विजय स्तंभाच्या सजावटीतून प्रकट होणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरवशाली इतिहास मांडत अशोकाचे धम्मचक्र व स्वाभिमानाचा निळा झेंडा फडकवत येणाऱ्या अनुयायांना प्रेरणा मिळणार आहे. – अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समिती