पुणे: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ९५४ कोरेगाव पुनर्वसनची विद्यार्थिनी कुमारी सानवी अतुल मोटे हिने लक्षवेधी यश मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत, सानवीची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने सादर केलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाट्यछटेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.
सानवी मोटेचे यश इथेच थांबले नाही. नुकत्याच पार पडलेल्या मनीषा भोयर स्मृती नाट्य स्पर्धा, २०२५ मध्येही तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सानवीच्या या दुहेरी यशाने तिच्या शाळेचे आणि गावाचे नाव उजळले आहे.
सानवीच्या या यशामागे तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, वर्गशिक्षिका कुलकर्णी मॅडम, तसेच नागरे सर, शिंदे सर, मिडगुले सर, गव्हाणे सर, जकाते सर, पराड मॅडम आणि बोराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सानवीचे आणि तिच्या शाळेचे अभिनंदन होत आहे.