कोरेगाव भीमा, ता. २८ , कोरेगाव भीमा (ता. शिरूर )येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी प्रजासत्ताक दिनी स्वतःचा ध्वजवंदनाचा मान महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल या गावातीलच गुणी खेळाडूंना देत समाजासमोर आदर्श घालून दिला असून महिला खेळाडूंचा सन्मान, मिळालेला मान गावातील गुणी महिला खेळाडूस देणे ही गावाप्रती असलेली सामाजिक जाणीव व बांधिलकी जपल्याने सरपंच संदीप ढेरंगे यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
कोरेगाव भीमा येथे ध्वजारोहण प्रसंगी गुणवंतांचा गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले होते. यावेळी त्यानंतर अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार सोहळ्याला ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात १८४ गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, ग्रामपंचायत सदस्य अमोल गव्हाणे, केशव फडतरे, महेश ढेरंगे, गणेश कांबळे शरद ढेरंगे, अनिकेत गव्हाणे, वंदना गव्हाणे, मनीषा गव्हाणे, जयश्री गव्हाणे, कोमल खलसे, शिल्पा फडतरे, ग्राम पंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
या प्रसंगी गुणवंताचा फेटा, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करताना हा आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तर यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमातही देशभक्ती गीतापासून आपली कला संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा यांचे दर्शन घडले.माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले, तर ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे व सातपुते सर यांनी सूत्रसंचालन केले.
सरपंच संदीप ढेरंगेंनी स्वतःचा ध्वजारोहणाचा मान दुसऱ्यांना देणे अभिमानास्पद – तुमचे क्षेत्र कोणतेही असो समर्पण, मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश नक्कीच मिळते. एकीकडे ध्वजारोहणाच्या मानपानावरून राजकारण चालू असताना गावच्यावतीने सरपंच संदीप ढेरंगे यांनी स्वतःचा ध्वजारोहणाचा मान मला देत समाजासमोर आदर्श निर्माण करत हा क्षण आम्हा खेळाडूंच्या दृष्टीने अभिमानाचा असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल यांनी सांगितले.