धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण

स्वराज्य टाइम्स न्यूज

कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड

शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. 

प्रविण अशोक कोल्हे (वय ३५), व्यवसाय अंडाभुर्जी विक्रेता, हे कोरेगाव भिमा गावातील खंडोबा मंदिराजवळ अंडाभुर्जीचा स्टॉल चालवत होते. मागील महिन्यात गावातील विशाल शिवले याला झालेल्या मारहाणीसाठी कोल्हे यांना जबाबदार ठरवत, विशाल शिवले आणि त्याचे सहकारी त्यांना सतत धमकावत होते. अखेर, ४ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता, या टोळक्याने कोल्हे यांना त्यांच्या स्टॉलजवळून जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून अपहरण केले.

कोल्हे यांना नरेश्वर मंदिराच्या दिशेने नेऊन, गाडीतून बाहेर ओढून क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली. या वेळी विशाल शिवलेने कोल्हे याला तुला तर गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार आहे” अशी धमकी दिली. अखेर प्रसाद वाळके आणि अजय शिवले यांनी येऊन कोल्हे यांना टोळक्याच्या तावडीतून सोडवले.

याप्रकरणी आरोपी १) विशाल बाळासाहेब शिवले, २) अनिकेत शहाजी शिवले, ३)अक्षय कैलास कोबल व ४) गणेश बाळासाहेब शिवले सर्व रा. वढू बु. ता.शिरूर जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हे आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेनंतर प्रचंड दहशतीत असून, त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.सदर प्रकरणाचा तपास  शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील करत आहेत.

कोरेगाव भीमा येथील मारहाण व अपहरण हा अत्यंत गंभीर प्रकार असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असून कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही –पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, शिक्रापूर पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!