जुन्नर (जिल्हा पुणे): जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील कोकणकड्याच्या सुमारे १२०० फूट खोल दरीत एक तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेची माहिती दिली.
मृत व्यक्तींची ओळख आणि बेपत्ता होण्याच्या तक्रारी – मृतांमध्ये रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०), मूळ गाव दुर्गावाडी (सध्या श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे तलाठी) आणि रूपाली संतोष खुटाण (रा. आंबोली, ता. जुन्नर) या महाविद्यालयीन युवतीचा समावेश आहे.रामचंद्र पारधी हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.त्याचप्रमाणे, रूपाली खुटाण हिच्या अपहरणाची तक्रारही जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होती.
शोधमोहीम आणि मृतदेह सापडण्याची प्रक्रिया – दुर्गावाडी येथील रिव्हर्स वॉटरफॉलजवळ काही दिवसांपासून एक पांढरी कार उभी असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. यामुळे संशय बळावला. परिसरातील कड्याच्या टोकावर शोध घेतला असता काही चपला आढळून आल्या. त्यानंतर दरीत खाली शोध घेतला असता, सुरुवातीला रूपालीचा मृतदेह आढळला.
दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे रविवारी संध्याकाळी शोधकार्य थांबवण्यात आले. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरीत आणखी खाली उतरले असता, काही अंतरावर तलाठी पारधी यांचाही मृतदेह आढळला.
जुन्नर पोलिस व रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह बाहेर काढून श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमागील नेमके कारण (हत्या की आत्महत्या) याचा तपास जुन्नर पोलीस करत आहेत.या शोध मोहिमेत जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, तसेच पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे व इतर सदस्य सहभागी होते.