महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली.
मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे घट बसविले. करवीर पिठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते बारा वाजण्याच्या सुमारास सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात घटस्थापना झाली. त्यानंतर नेहमीची खंडोबाची त्रिकाल पूजा झाली. पौराहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी व मंगेश खाडे यांनी केले. दुपारी एक वाजल्यानंतर गडावर महाप्रसाद कार्यक्रम सुरू झाला. सर्व भाविकांना सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले.
जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर मार्तंडविजय ग्रंथाचे पारायण, मल्हारीसहस्त्रनाम याग होणार आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) देवदिवाळी उत्सवानिमित्त नवरात्र महालात फराळाचा रुखवत मांडला जाणार असुन शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री खंडोबा देवाला तेलवण करुन हळद लावली जाणार आहे.
उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असुन ऎतिहासिक गडाला नेत्रदीपक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे. सोमवारी सकाळपासून खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

खंडोबाचे षडरात्रोत्सव – खंडोबा भक्तांच्या घरात चंपाषष्ठीनिमित्त घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेपासून जसे देवीचे नवरात्र असते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्य़ंत सहा दिवस खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठीला देवाचे घट उठवले जातात,यावेळी पुरणपोळी आणि वांग्याचे भरीत-रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने या काळात मार्तंड भैरवाचा अवतार घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे याकाळात मार्तंड भैरवाचा अवतार घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या उत्सवाला महत्त्व आहे.
मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींची पाखळणी, पूजा-अभिषेक झाल्यावर सकाळी अकरा वाजता उत्सवमुर्ती सनई-चौघड्याच्या निनादामध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. नवरात्र महालात धार्मिक वातावरणात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मुर्तीची घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी आणि मंगेश खाडे यांनी पौरोहित्य केले.
वर्षाच्या शेवटी असते देव दिवाळी – वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू झाला असून, आज २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला आहे. या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दीपावलीचा असतो.या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करण्याची परंपरा आहे. यादिवसापासून खंडोबाचे नवरात्र सुरू होते.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. या वर्षी ६ तारखेला नागदिवे पूजन होणार असून, ७ डिसेंबर २०२४ ला चंपाषष्ठी आहे.
खंडोबाचे नवरात्र मान्यता -‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती अर्पण केली जातात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा आणि तळी भरण्याचे महत्व – चंपाषष्टी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदेस देवाची घट स्थापना होते व षष्टीस या उत्सवाची सांगता होते, खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरांमध्ये हि घट स्थापना केली जाते, प्रतिपदेस घट स्थापना करून सहा दिवस हा उत्सव चालतो कुटुंब प्रमुख उत्सवात उपवास धरतात, रोज घटावर फुलांची माळ सोडली जाते, चंपाषष्टीस घटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड होय. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे – तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.