कर्तव्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची स्वराज्य सरपंच सेवा संघाकडून दखल
अहिल्यानगर: सामजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय महिला समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश कुमार पावसे, उज्जैन महाकालचे श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया, डॉ. शंकर अंदानी आणि सिनेतारका रुचिरा देसाई यांची विशेष उपस्थिती होती. तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे यांच्यासह राज्यातील विविध गावांतील सरपंच उपस्थित होते.

अष्टपैलू समाजसेवेचा सन्मान : मनीषा गडदे यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवली आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेत असताना फाउंडेशनने राबवलेली आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीम आणि मोफत नेत्र तपासणी यांसारख्या आरोग्य सेवांचा विशेष उल्लेख करण्यात आला. केवळ आरोग्यच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

वंचितांच्या आयुष्यात फुलाविली दिवाळी : ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप, अनाथ आश्रमांना नियमित मदत आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न मनीषा गडदे यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती देतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांना दिलेले प्रशिक्षण आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे या उपक्रमांचेही मान्यवरांनी कौतुक केले. १ जानेवारी रोजी भीमानुयायांसाठी राबवण्यात येणारा अल्पोपहार आणि चहा-पाणी वाटपाचा उपक्रम फाउंडेशनच्या वतीने सातत्याने राबवला जातो.
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अंकुश घारे, ग्रंथपाल संतोष काळे, पत्रकार राजाभाऊ गायकवाड, महेश शिर्के, निलेश जगताप, भरत खोले, संकेत गडदे, हार्दिक गडदे, मेघा तांबे, वंदना रामगुडे, वैशाली गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
