विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे.
बारामती – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरणावर मोठा प्रभाव पडला आहे.
बारामतीतील गोविंद बाग येथे आयोजित महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत तालुक्यातील प्रगतीवर भाष्य केले. “शिरूरच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी सर्वोत्तम औद्योगिक वसाहत येथे आणली, डिंभे आणि चासकमानचे पाणी उपलब्ध करून शेतीला समृद्ध केले. अशोक पवार यांच्या कार्यातून शिरूर तालुका प्रगतीपथावर आहे. मात्र, विरोधकांकडे आता आरोपांसाठी फक्त ‘घोडगंगा’ हेच एकमेव हत्यार उरले आहे,” असे त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अशोक पवार यांच्या कामगिरीची शरद पवारांकडून प्रशंसा –
कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी अशोक पवार यांचे कौतुक करताना त्यांना “सर्वसामान्यांचा खरा नेता” असे गौरवले. “ज्या नेत्याच्या पाठीशी जनता ठाम उभी राहते, तोच खरा नेता असतो,” असे सांगत त्यांनी अशोक पवार यांच्या कार्याची दखल घेतली.
आमदार अशोक पवारांनी ज्या प्रकारे शिरुर हवेलीच्या सार्वांगिण विकासाचा आलेख उंचावला आहे, तो दखलपात्र आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता सक्रिय असते तोच खरा नेता असतो. आज ज्या प्रकारे शिरूर हवेलीची जनता अशोक पवारांच्या पाठीशी ठामपणे, निष्ठेने, आणि विश्वासाने उभी आहे, ते पाहून अशोक पवार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत, हेच अधोरेखित होते, अशा शब्दात अशोक पवारांचे शरद पवार यांनी कौतुक केले.
यावेळी कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, सुलभा उबाळे, राजेंद्र सातव, प्रदिप कंद, सतीष कोळपे, सुभाष कोळपे, अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.