कोरेगाव भिमा येथे शिनगारे कुटुंबियांकडून आकर्षक देखावा,सुग्रास भोजनासह रांगोळ्या, सडा शिंपण, पारंपारीक वेशभूषा, फेर धरत, गाणी म्हणत गौराईचे स्वागत
कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे आली गवर आली.. सोन पावली आली..! अशी गौरी गीते गात गौराईचे आवाहन करण्यात आले. दारी आलेल्या गौराईला लिंबलोण करत सुवासिनिंनी माहेरवाशिणी गौराईचे मंगळवारी (दि. १०) घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले.गौराईंच्या आगमनाने घरात मांगल्य व चैतन्य पसरले आहे. महिला भाविकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण असून कोरेगाव भिमा येथील शिक्षिका सोनाली योगेश शिनगारे यांच्या घरी गौराईचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
शिक्षिका सोनाली योगेश शिनगारे व रेणुका साईनाथ शिनगारे यांच्यासह कुटुंबीयांनी घरात गौरी गणपती देखाव्यासाठी एकविरा देवीच्या डोंगरासह मंदिराची प्रतिकृती साकारत नैसर्गिकरीत्या सजवण्याचे व रंगीबेरंगी मनोवेधक विद्युत रोषणाई करण्यात केली.गौराई व मधोमध श्री गजाननाची आकर्षक व मनमोहक रूप पाहून भक्तीने आपोआप हात जोडले होते.
घागर घुमूदे घुमूदे, रामा, पावा वाजू दे,
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे,
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा,
आली गौराई अंगणी तिला लिंब-लोण करा…
अशी पारंपारीक गाणी म्हणत शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे लाडक्या गणरायाच्या आगमन सोहळ्यानंतर अवघ्या भाविकांना आतुरता लागून असलेल्या गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर झाले. महालक्ष्मींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच महिलांची लगबग सुरू होती. घरात हळदी-कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करत गौराईंची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गौराई माहेरवाशिणी म्हणून घरी पाहुणचार घेत आहेत. बुधवारी (दि. ११) श्री महालक्ष्मींचे महापूजन करण्यात आले.यावेळी पुरणपोळी, करंजी-लाडू, सोळा प्रकारच्या भाज्या तसेच अन्य पदार्थांचा महानैवेद्य गौराईंना अर्पण केला . वर्षभरानंतर माहेरवाशिणी घरी आल्याने भाविकांमध्ये आनंद आहे. गौराईंच्या सेवेत कमतरता भासू नये यासाठी भाविक विशेषत: महिला वर्ग अधिक काळजी घेत आहे.
तीन दिवस मनोभावे पूजन – गौराई म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीस आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहात स्वागत करण्यात आले. तीन दिवस घरोघरी महालक्ष्मींचे मनोभावे पूजन केले जाते.
याप्रसंगी शिक्षिका भाग्यश्री कट्यारमल व छाया शिनगारे यांनी पारंपारिक गाणे गात ,उखाणे घेत व फेर धरल्याने गौरीचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षिका सोनाली योगेश शिनगारे,रेणुका शिनगारे, ,स्वप्नाली भोकरे, वर्षा गव्हाणे, चंदा सुपेकर, वैजा नेमाडे, संगीता भोकरे, ऐश्वर्या शिनगारे, अनु भोकरे, सरला हुशार यांच्यासह इतर महिला भगिनींनी भोंडला, फुगडी, व पारंपारीक गाणी गात फेर धरत ,उखाणे घेत मोठ्या भक्ती भावाने खेळ व पारंपारिक सण उत्साहात साजरा केला.
सेवाधाम मतिमंद विद्यालय वाजेवाडी येथे मुख्याध्यापक पवन कट्यारमल व भाग्यश्री कट्यारमल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका म्हणून मागील अनेक वर्षांपासून सामाजिक जाणीव व बांधिलकी संवेदनशिलतेने जपत सोनाली योगेश शिनगारे मॅडम ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडत असून अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे व त्यांना घडवण्याचे काम करत आहेत.