फुलगाव (ता. हवेली) — ग्रामपंचायत फुलगाव येथे महिला व बालविकास निधीतील १०% रकमेतून संपूर्ण गावातील युवक, तरुणी आणि महिलांसाठी मोफत चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत हॉल येथे झालेल्या या उपक्रमाच्या शुभारंभाने फुलगाव ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

महिलांना स्वावलंबनाकडे नेणारा उपक्रम – या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यावर गावातील प्रत्येक महिलेकडे चारचाकी वाहन चालविण्याचे कौशल्य आणि वैध परवाना (लायसन्स) असेल. हा महाराष्ट्रातील पहिला गावस्तरीय उपक्रम ठरणार आहे, असे ग्रामपंचायत अधिकारी धीरज घोटाळे यांनी सांगितले. “फुलगाव हे राज्यातील पहिले गाव ठरेल, जिथे प्रत्येक महिला आणि तरुणीला चारचाकी चालवता येईल. आगामी काळात आणखी लोककल्याणकारी योजना राबविणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
गावचा अभिमान गावकऱ्यांचा उत्साह, महिलांचे स्वावलंबन- कार्यक्रमाच्या शुभारंभाला लोकनियुक्त माजी सरपंच मंदाकिनी साकोरे, माजी सरपंच कांताराम वागस्कर, ग्रामपंचायत प्रशासक शिरीष मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत खंडे, गावातील महिला शिक्षक, माजी सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित महिला-तरुणी उपस्थित होत्या.

माजी सरपंच मंदाकिनी साकोरे म्हणाल्या, “ही योजना गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे. महिलांनी या संधीचा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी.”
माजी सरपंच शकांताराम वागस्कर यांनी “गावातील प्रत्येक तरुणी ड्रायव्हिंगमध्ये पारंगत होणे म्हणजे समाजातील परिवर्तनाचा संदेश आहे,” असे सांगत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले.

प्रशिक्षकांची मार्गदर्शक भूमिका – वाघोली येथील न्यू परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकांनी महिलांना सुरक्षित व नियमबद्ध वाहनचालक होण्यासाठी आवश्यक माहिती दिली. या प्रशिक्षणात व्यावहारिक व सैद्धांतिक अशा दोन्ही टप्प्यांचा समावेश आहे.
महिलांच्या हातात विकासाची सुकाणू – शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून आणि रिबीन कापून ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गावातील महिला भगिनींनी “आता सुकाणू आमच्या हाती!” अशी गर्जना करत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण दिले.
ग्रामपंचायत प्रशासक शिरीष मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत “फुलगाव हे महिला सक्षमीकरणाचे आदर्श गाव बनावे, हीच अपेक्षा” असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.
