मोबाईलच्या जगातून निसर्गाच्या कुशीत; वृक्षदिंडी ते वनभोजन असा पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ व निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारा सणसवाडीचा विधायक उपक्रम
मोबाईलच्या जगातून निसर्गाच्या कुशीत; वृक्षदिंडी ते वनभोजन असा पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ व निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारा सणसवाडीचा विधायक उपक्रम
“पर्यावरण, शिक्षण आणि संस्कारांचा संगम घडवणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे सरपंच रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर
सणसवाडी (ता. शिरूर) –आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या आभासी जगात गुरफटली असताना, सणसवाडी ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच रुपाली दरेकर यांच्या सहकार्याने सणसवाडी व परिसरातील सात शाळांमधील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांसाठी भव्य निसर्ग सहल, वृक्षदिंडी, वनभोजन आणि विविध सांस्कृतिक-क्रिडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्देश फक्त मनोरंजन नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी, देशभक्ती आणि निसर्गप्रेमाची बीजे रोवणे हा होता.
या सहलीचे आयोजन उपसरपंच राजेंद्र दरेकर आणि सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी केले होते. यामध्ये सणसवाडीतील जिल्हा परिषद शाळा (सणसवाडी व वसेवाडी), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नॉवेल प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूल, जयवंत पब्लिक स्कूल आणि अंजली इंटरनॅशनल स्कूलमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे, मुख्याध्यापक राजेंद्र दरेकर, भंडारे सर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
“आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. निसर्गाशी जोडून आणि मैदानी खेळांतून शारीरिक तंदुरुस्ती जपणे, सामाजिक बांधिलकी वाढवणे,विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदूचा समतोल साधत देशावर प्रेम करणारी भावी पिढी घडवणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.” – उपसरपंच राजेंद्र दरेकर
वृक्षदिंडीने सुरुवात – पर्यावरण संदेशाचा प्रवास – या सहलीची सुरुवात एका अनोख्या ‘वृक्षदिंडी’ने झाली. “वृक्ष लावा – पर्यावरण वाचवा” अशा घोषणांचा निनाद करत विद्यार्थ्यांनी सणसवाडी गावापासून श्री. नरेश्वर महाराज मंदिरापर्यंतचे पाच किलोमीटरचे अंतर पायी पार केले. मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
निसर्गाच्या कुशीत खेळ, संस्कार आणि ज्ञान – नरेश्वर मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, मॅरेथॉन स्पर्धा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला. मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी जैवविविधता, झाडे, फुले, मातीचे प्रकार, खडकांचे स्वरूप यांची प्रत्यक्ष माहिती घेतली.
गावातील प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरचच निसर्ग, खेळ आणि संस्कार यांच्या संगतीत मुलं घडली पाहिजेत. या निसर्ग सहलीतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शिकवण घेतली, सामूहिकतेचा अनुभव घेतला आणि देशभक्तीची जाणीव मनात रुजवली, याचा आम्हाला अभिमान आहे. पुढेही अशा विधायक उपक्रमांद्वारे मुलांना नवे अनुभव देत राहू.”- सरपंच रुपाली दगडू दरेकर
सुरक्षित आणि नियोजनबद्ध उपक्रम – विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पौष्टिक वनभोजन यांची सोय करण्यात आली होती. यामुळे उपक्रम सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक ठरला.
विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव – या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील जगाची ओळख झाली, निसर्गाशी आत्मीय नाते जोडले गेले आणि सामूहिक उपक्रमातून ऐक्याची भावना निर्माण झाली. सणसवाडी ग्रामपंचायतीच्या या विधायक आणि दूरदृष्टीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि नैतिक विकासाला चालना देणारा ठरला आहे.
पर्यावरण, शिक्षण आणि संस्कारांचा संगम घडवणारे प्रेरणादायी नेतृत्व – “सामाजिक बांधिलकी आणि दूरदृष्टी यांची सांगड घालत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सणसवाडीच्या सरपंच रुपाली दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर या स्दुरदृष्टीच्या नेतृत्वाची प्रेरणादायी ओळख निर्माण झाली आहे. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि संस्कार यांना प्राधान्य देत त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.”