अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर: न्हावरे (ता. शिरूर) येथील पत्रकार आणि मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती कारंडे यांचे आज पहाटे (दि. १ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते अवघे ४५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. कारंडे यांनी तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय आणि न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जून विद्यालयात मराठीचे अध्यापन केले. ते विद्यार्थी प्रिय आणि अभ्यासू शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांनी ‘धनगरी लोकसाहित्याचा’ अभ्यास करून पीएच.डी. पदवी मिळवली होती.
नामांकित दैनिकात काम करताना स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली. तसेच, न्हावरे येथे श्री. मल्लिकार्जून सार्वजनिक वाचनालय स्थापन करून वाचन चळवळ वाढवली.त्यांच्या निधनाबद्दल अनेक सहकारी आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांनी दुःख व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे महाविद्यालय नामदेव भोईटे यांनी त्यांना शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे यांनी डॉ. कारंडे यांचे निधन अनपेक्षित आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. पत्रकार विजय ढमढेरे यांनीही त्यांचे पत्रकारितेतील योगदान आठवून श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड यांनी पत्रकार दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.डॉ. कारंडे यांच्या निधनामुळे शिरूर तालुक्यातील अनेक पत्रकार आणि शिक्षक वर्गावर शोककळा पसरली आहे.
