लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के गंभीररीत्या भाजला आहे. त्याला आणखीन पंधरा दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार असून, त्याचा खर्च पाच ते सहा लाख रुपये आहे. त्यासाठी दानशूरांच्या मदतीची गरज आहे.
समर्थच्या डोक्याला, पाठीला, पायांना व जवळपास अर्ध्या शरीराला भाजल्यामुळे गंभीर जखमा झाला असून, त्याच्यावर ७ फेब्रुवारीपासून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत रणनवरे कुटुंबाने मित्रमंडळी, नातेवाईक, महावितरणचे कर्मचारी, समर्थच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व काही संस्थांकडून पाच लाख ३० हजार रुपयांचा निधी उभा करून रुग्णालयाचा खर्च भागविला आहे.
मूळ गाव राख (ता. पुरंदर) गावातील अमर रणनवरे हे आपल्या कुटुंबासमवेत जेजुरीत वास्तव्याला आहेत. अमर रणनवरे हे नगर परिषदेच्या विविध योजनांमध्ये ११ वर्षांपासून ‘समुदाय संघटक’ म्हणून कंत्राटी तत्त्वावर नाममात्र वेतनावर काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. समर्थ हा अमर यांचा एकुलता एक मुलगा असून, तो जेजुरीतील जिजामाता हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत आहे. समर्थच्या आधी रणनवरे दांपत्याला तीन मुले झाली होती. पण नियतीने तिन्ही मुले जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच हिरावून घेतली.
दरम्यान, रणनवरे कुटुंब रुग्णालयात असताना त्यांचे जेजुरीतील घर चोरट्यांनी फोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. समर्थवर पूर्ण उपचार व्हावेत, तो लवकर बरा व्हावा आणि वैद्यकीय उपचारांना निधी मिळविण्यासाठी रणनवरे कुटुंब जिवाचे रान करत आहेत. आपणही शक्य तेवढी समर्थ ला मदत करावी असे आवाहन त्याच्या वडिलांनी केले आहे.
- या बँक खात्यावर मदत पाठवावी:-
- श्री अमर पोपटराव रणनवरे, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे.बँक ऑफ बडोदा, जेजुरी शाखा.
- IFSC : BARB0JEJURI MICR Code : 411012030.
- Customer ID : 020728249Account Number : 04530100016458