आमदार माऊली कटके यांच्यासह भाऊ अनंता कटके यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल
पुणे, २५ जुलै २०२५: दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेपेक्षाही अधिक चर्चा सध्या शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांच्या नाहक बदनामीची होत आहे. याप्रकरणी अनंता कटके यांच्यासह समर्थकांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
माऊली कटके आणि अनंता कटके यांची नाहक बदनामी – दौंड गोळीबार प्रकरणाची माहिती सुरुवातीला समोर आली, तेव्हा केवळ “आमदाराच्या भावाने गोळीबार केला” असे म्हटले जात होते. मात्र, लवकरच समाज माध्यमांवर या प्रकरणाशी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके (माऊली) आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचा संबंध जोडून खोटे मेसेज व्हायरल झाले. कटके बंधूंचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना, त्यांच्या समर्थकांनी वाघोली, उरुळी कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्यांमध्ये बदनामीविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे बंधू अनंता कटके यांनी वाघोली पोलीस ठाण्यात थेट रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दौंडमध्ये नेमकं काय घडलं? वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै २०२५) रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. मात्र, टीकेनंतर ३६ तासांनी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद घेऊन गोळीबार झाल्याचे स्पष्ट केले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे.
या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून, ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.