शिक्रापूरमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर (ता. शिरूर)  येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अर्थात फाशीची मागणी केली आहे.

या निषेध मोर्चात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चाला शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, भाजप नेत्या जयश्री पलांडे, भाजपाचे जयेश शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, माजी सभापती जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, युवा सेना तालुकाध्यक्ष विजय लोखंडे, बजरंग दलाचे अध्यक्ष महेश चव्हाण व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि अशा घटनांना आवर घालण्यासाठी शासनाने कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. यावेळी उपस्थितांनी घटनेला कोणतेही राजकीय वळण न देण्याचे आवाहन केले आणि सामाजिक सलोखा राखण्याची विनंती केली. तसेच, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून वेगवान कारवाई केली याबद्दल त्यांचे आभार मानले.

घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नियंत्रणाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!