धक्कादायक! वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी तहसीलदारांना ३ तास ठेवले बसून वर त्यांचीच गाडी केली जप्त ..

Swarajyatimesnews

छत्रपती संभाजीनगर शहरात वाळूमाफियावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तहसीलदार रमेश मुंडलोड यांना पोलिसांची धक्कादायक कारवाई नशिबी आली. तहसीलदारांना पोलीस चौकीत तीन तास बसवून ठेवण्यात आले आणि त्यांचे शासकीय वाहन जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने महसूल व पोलीस प्रशासनासह राज्यात खळबळ उडाली आहे. 

तहसीलदारांची गाडी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार महाराष्ट्रात घडला असावा. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलिस आयुक्तांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत.या धक्कादायक घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी समोर आली असून वाळूमाफियांना अभय देण्यासाठी पोलिसांची मजल तहसिलदाराला शिवीगाळ करत वाहन जप्त करण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचेच गुन्हेगारीला पाठबळ असल्याचं बोललं जात आहे.

छत्रपती संभाजीनगरचे तहसिलदार रमेश मुंडलोड, दि. ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०. वा. शासकीय काम आणि काही राजशिष्टाचाराची कामे आवरून घराकडे जात होते. यावेळी गारखेडा परिसरातील विजय चौक या ठिकाणी एक रेतीने (वाळूने) भरलेला हायवा आढळून आला. वाळू वाहतुकीबाबत वाहनचालकास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता वाहनचालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. या गाडीच्या मालकाविषयी विचारणा केली असता त्यांनी पवार नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांची गाडी आहे असे सांगितले. हे कळताच संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना बोलावून घेऊन तलाठी यांना गाडीमध्ये बसून ते वाहन जप्त करण्यास तहसील कार्यालयाचे आवारात घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारी रेती माफिया, पोलीस कर्मचारी पवार ,तसेच इतर सगळ्यांनी मिळून तहसिलदारांची गाडी थांबवली. तहसिलदार ऑफिसची गाडी  थांबून अरेरावीच्या भाषेत बोलत होते. पवार नावाच्या पोलिस कर्मचारी तहसिलदारांना शिवीगाळ करत होता. याचाबतची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग तहसिलदारांनी रेकॉर्ड केली आहे. 

पोलीस कर्मचारी  पवार यांनी १००-१५० वाळू माफिया आल्यावर तहसीलदारांचा मार्ग रोखला, त्यांच्याशी वाद घालून तहसीलदारांची गाडी जप्त केली. तसेच, पवार यांनी तहसीलदारांना धमकावले की, त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात काहीही कारवाई होणार नाही.

तहसीलदारांनी पुढे जाऊन जिन्सी पोलिस ठाणे येथे तक्रार केली, पण पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेता, उलट पोलिसांनी तहसीलदारांची गाडी जप्त केली, सदर प्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलिस आयुक्तांना कार्यवाहीसाठी आदेश दिला आहे. 

तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे शासकीय वाहन चौकीत तर त्यांना  खाजगी वाहनाने जावे लागले घरी – ‘मी पोलिसस्टेशन जिन्सी येथे उपस्थित पोलिस उपनिरीक्षक यांना झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली, परंतु वाळू वाहतूक करणारे पवार हे पोलिस कर्मचारी असल्याने पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित अधिकारी यांनी माझी तक्रारीची नोंद करुन न घेता वाळूमाफिया पोलिस कर्मचारी यांचीच असल्याने त्यांना साथदेत उलट माझ्याच वाहनाची चावी काढून घेऊन मला पोलिस स्टेशन येथे बसवून ठेवले. रात्रीचे १ वाजेपर्यंत पोलिस स्टेशन जिन्सी येथे माझी कुठलीही तक्रार पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदवून न घेतल्याने मी रात्री १ वाजता लेखी स्वरूपात तक्रार देऊन मला कार्यालयाची गाडी परत देण्यासाठी विनंती केली असता पोलिस अधिकारी व नकर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘तुमची गाडी अवैधरीत्या फिरत होती म्हणून आम्ही जप्त केली आहे. अशा प्रकारे उत्तर देऊन मला कार्यालयाची गाडी देण्यात आलेली नाही. मी पथकातील कर्मचारी यांच्या खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन येथून जमा झालेल्या १०० ते १५० वाळुमाफीयांच्या गराड्यातून सुटका करून घेऊन घरी गेलो. असे तहसिलदारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!