सातारा, मंगळवार पेठ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने तिचा खून करून मृतदेह कॉटच्या खाली लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. सौ. अंजली राजेंद्र शिंदे (वय 29) असे मृत महिलेचे नाव असून, पती राजेंद्र शिंदे (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंजलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिंदे दाम्पत्यामध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. 19 जून रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. दुसऱ्या दिवशी मुलींच्या मामाने घरी आल्यावर मुलींनी मृतदेहाची माहिती दिली. अंजलीचा मृतदेह घरातील कॉटखाली गाठोड्याने झाकलेला आढळून आला.
फिर्यादीनंतर भावाचा व पतीचा वाद होऊन झटापट झाली. यात राजेंद्र जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदन तब्बल अडीच तास चालले, मात्र शरीरावर कोणतीही जखम न आढळल्याने पोलिसांपुढे गूढ उभे राहिले आहे. अंजलीचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय शिर्के करत आहेत.