वाघोली (ता.हवेली): नागपंचमीच्या पवित्र आणि पारंपरिक दिवशी, अंधश्रद्धांना छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘सापांविषयी जनजागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, IQAC समन्वयक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, तसेच वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. देविदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी समाजातील सापांविषयीच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यावर भर दिला. त्यांनी सापांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर डॉ. माधुरी देशमुख यांनी परिसंस्थेतील सापांचे अनमोल महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची निकड यावर प्रकाश टाकला.
कार्यशाळेचे मुख्य आकर्षण होते, पुणे परिसरात १८ वर्षांचा सर्पमित्राचा अनुभव असलेले श्री. साईदास कुसळ यांचे मार्गदर्शन. त्यांनी “साप जनजागृती आणि वैज्ञानिक पद्धतीने सापांचे जतन” या विषयावर अत्यंत सखोल माहिती दिली. श्री. कुसळ यांनी विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख कशी करावी, तसेच सर्पदंश झाल्यास तातडीने कोणते प्राथमिक उपचार करावेत, याबद्दल विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आणि प्रात्यक्षिक माहिती दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढले.
या कार्यशाळेत आर्ट्स, कॉमर्स, BBA (CA) आणि सायन्स या सर्व शाखांतील एकूण १०८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, जो त्यांच्यातील या विषयाबद्दलची उत्सुकता आणि गांभीर्य दर्शवतो.
या यशस्वी कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. तेजल देवोकर, डॉ. सादिया शेख, डॉ. स्वप्नगंधा सोनवणे, डॉ. त्रिविक्रम देशपांडे आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी जागरूकता आणि वैज्ञानिक विचार वाढीस लागण्यास मदत झाली आहे.