वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात धेय्य निश्चित करून त्यादिशेने वाटचाल करायला हवी. कष्ट केल्याने आयुष्याची उंची वाढते आणि आपल्या मधुर वाणीने इतरांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करायला हवा असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी मत व्यक्त केले.
शिवराज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष जयंती या निमित्ताने बीजेएस वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी गडकोट आमुचे या विषयावर पाच दिवसांची व्याख्यानमाला बीजेएस माजी विद्यार्थी संघटना व इतिहास विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. भूषण फडतरे यांनी घोषित केले.
माजी विद्यार्थी माऊली उगले, अक्षय हारगुडे, डॉ. सहदेव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर माजी विद्यार्थी आकाश शिंगाडे, वृषाली कुसाळकर, शुभम आव्हाळे यांनी मनोरंजनात्मक केलेल्या कलेला विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास राऊत यांनी तर आभार भुजबळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी साईनाथ रापतवार, डॉ. संगिता लगड, रामदास औटे, माजी विद्यार्थी संघटना प्रमुख कुणाल बेंडभर, कोमल शिंदे, माधुरी पाटील, रेवती कांबळे, निलेश पंचमुख, नितीन भुजबळ, राहुल मांजरे, आकाश चव्हाण, गौरव गायकवाड आणि शुभम भोंडवे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.