पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती.
तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी लाचेच्या प्रकरणांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.