भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय शिबिरात ८ राज्यांतील २१५ संशोधकांचा सहभाग
वाघोली (ता. हवेली), दि. १० जानेवारी : ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीने भारतीय संस्कृतीला दुय्यम ठरवत भारतीयांच्या मनात न्यूनगंड आणि गुलामगिरीची मानसिकता रुजवली. आता काळाची गरज म्हणजे पाठ्यपुस्तकांचे ‘निर्वासहतीकरण’ करून समृद्ध, शाश्वत आणि आत्मविश्वासपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन करणे. हेच भारतीय ज्ञान प्रणालीचे (IKS) खरे उद्दिष्ट असल्याचे परखड मत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केले.

भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय शिबिरात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या शिबिरात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, गोवा यांसह देशातील ८ राज्यांतील २१५ संशोधकांनी ऑनलाइन व ऑफलाइन सहभाग नोंदवला.
मेकॉलेपासून मुक्ती हीच खऱ्या अर्थाने शैक्षणिक स्वातंत्र्य : यापुढे बोलताना डॉ देवळणकर यांनी “१८३५ मध्ये मेकॉलेने लादलेली शिक्षण पद्धती केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नव्हती, तर तिने भारतीय संस्कृतीच नाकारली. आपल्या इतिहासाकडे, ज्ञानाकडे आणि परंपरेकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. ही मानसिक गुलामगिरी झुगारून देत भारतीय ज्ञान प्रणालीचे पुनरुज्जीवन करणे, हाच विकसित भारताचा खरा पाया आहे.”असे प्रतिपादन केले.

नालंदाचा वारसा आणि शिक्षणाचे जागतिकीकरण : “आज युरोपातील २० देशांची मिळून जेवढी लोकसंख्या आहे, तेवढे पदवीधर एकट्या भारतात आहेत. मात्र, पदवीसोबत कौशल्याची जोड आवश्यक आहे. नालंदा विद्यापीठाच्या समृद्ध वारशावर आधारित भारतीय ज्ञान प्रणाली, ‘IKS पोर्टल’ आणि केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण भारताला पुन्हा जागतिक ज्ञानकेंद्र बनवू शकते. जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची उत्तरे भारतीय संस्कृतीतच दडलेली आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिटिशांनी सिमेंटच्या नावाखाली भारतीयांना ‘चुना’ लावला – पुणे पुरातत्व विभाग व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे सहाय्यक संचालक विकास वाहणे यांनी भारतीय स्थापत्यकलेचा गौरव करताना सांगितले,
“ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक स्थापत्य परंपरेचा नाश करून सिमेंटच्या नावाखाली आपल्याला केवळ ‘चुना’ लावला. आजच्या इमारती शंभर वर्षेही टिकत नाहीत; मात्र हजारो वर्षांपूर्वी उभारलेली मंदिरे, किल्ले, लेण्या आजही अभेद्य उभी आहेत. लोहस्तंभ गंजत नाही, बारवा आजही कार्यरत आहेत. हे विज्ञान आपण पुन्हा आत्मसात करायला हवे.”

डॉ. लहू गायकवाड यांनी “भारत हा ‘प्रकाशयात्री’ आहे. गिरनार शिलालेखापासून उपनिषदांपर्यंत ज्ञानाची अखंड परंपरा येथे वाहते. ज्ञानाला अहंकार जोडला की ऱ्हास सुरू होतो, हे विसरता कामा नये.”

डॉ. ढिकले: “भारताने कधीही शस्त्राच्या जोरावर आक्रमण केले नाही; तरीही २२ देशांत भारतीय विचार आणि बौद्ध धर्म पोहोचला. हा आपल्या संस्कृतीचा विजय आहे.”
निलेश जाधव (ICHR): शिबिरातील उत्कृष्ट शोधनिबंधांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनीषा बोरा यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सिद्धेश्वर गायकवाड आणि प्रा. मोनिका जैन यांनी केले. प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड यांनी या उपक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, सी ई ओ डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भूषण फडतरे, सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले, डॉ. सचिन कांबळे, प्रा. भारती जाधव, प्रा. कल्याणी राऊत, प्रा. यश तनपुरे, कार्यालयीन अधीक्षक एस. डी. पाटील, गिरीश शहा, चेअरमन बाळासाहेब सूर्यवंशी , रामदास बटूळे यांच्यासह संपूर्ण शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

