आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला.
दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सर्पदंशानंतर योग्य उपचार पद्धतींचा अभाव आणि रुग्णालयात पोहोचण्यात झालेला विलंब यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून अनेक नागरिकांनी त्यांच्या निसर्ग संवर्धनासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत दुःख व्यक्त केले आहे.राहुल स्वामी यांनी अनेक वर्षे निसर्ग व सर्पसंवर्धनासाठी काम केले. त्यांच्या जाण्याने गावातील एक निसर्गप्रेमी व्यक्तीमत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
“सर्पमित्रांमध्ये सर्पदंशाचे प्रमाण सध्या खूप वाढत असून त्यात बऱ्याच सर्पमित्रांचा मृत्यू झाला आहे. सर्पमित्र जीवाची बाजी लावून ,निसर्ग संवर्धनाचे काम करत आहेत , नजर चुकीने सर्पदंश होतो, लवकर न मिळालेल्या औषधोपचारात झालेल्या दिरंगाई मुळे ,बऱ्याच सर्पमित्रांचा मृत्यू होतो.त्या मुळे सर्पमित्रांनी ,साप पकडताना व साप जंगलात सोडताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच शासनाने देखील सर्पमित्रांसाठी उपचार तातडीने मिळण्याबाबत उपाययोजना राबवण्याची गरज आहे.” – सर्पमित्र गणेश टिळेकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेचर गार्ड ऑर्गायझेशन