अॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती
पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अॅप तयार केले आहे.
श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार केलेल्या या अॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत माहिती मिळते. या अॅपमध्ये AI चॅटबॉटचा समावेश असून, शेतकरी त्यांच्या मातृभाषेत थेट प्रश्न विचारू शकतात. तसेच, दुष्काळ आणि जलटंचाईसारख्या अडचणींवर मार्गदर्शन मिळते.
हे अॅप शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची थेट विक्री करता येते. या प्रकल्पाची निवड भारत सरकारच्या MSME Hackathon 4.0 मध्ये झाली आहे. तसेच, या प्रकल्पाने PES Modern College of Engineering मध्ये “ASPIRE 2K25” मध्ये प्रथम क्रमांक आणि TSSM’s RSCOER येथे “TECHNOVISION 2K25” मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
हा प्रकल्प प्रा. नितीन मोहन शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. लवकरच हे अॅप Google Play Store वर उपलब्ध होणार आहे.
या यशाबद्दल विभाग प्रमुख डॉ. गायत्री भंडारी, प्राचार्य डॉ. टी. के. नागराज आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. व्ही. ए. बुगडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.