खुद्द पंडित प्रदीपजी मिश्रांच्या हस्ते महाप्रसाद वितरण; धारिवाल फाऊंडेशनचा अन्नदानाचा अखंड यज्ञ १० हजार शिवभक्तांनी घेतला मायेचा घास, रोजा असूनही मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावले वातावरण
शिरूर – कधी रसाळ जिलेबी, कधी मऊसूद बुंदी, कधी बालुशाही तर कधी आंबरसाचा गोडवा… सोबतीला गरमागरम फुलके, दोन भाज्या आणि तृप्त करणारा वरण-भात. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या ‘श्री शिव महापुराण’ कथेचे. या सोहळ्यात केवळ ज्ञानाची गंगाच वाहत नाही, तर ‘माता कमला की रसोई’च्या माध्यमातून श्रद्धेचा आणि समर्पणाचा एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळत आहे. आज खुद्द पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी या रसोईला भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने जेवण वाढले, तेव्हा सेवेचा हा गौरव पाहून उपस्थितांचे डोळे भक्तीने पाणावले.
आयोजक प्रकाश धारिवाल यांच्यासह दीना धारिवाल, आदित्य धारिवाल, साक्षी धारिवाल यांनी स्वतः उभे राहून सेवा बजावली. या कार्यात श्री जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया, माजी नगरसेवक विजय दुगड व सचिन धाडीवाल, मयूर नहार, पवन गांधी, प्रमोद सागवेकर, शरद कालेवार, शंकरकाका परदेशी, सुशांत कुटे, जितेंद्र खांडरे, महिबूब सय्यद, अनिल बांडे, पंकज कोठारी, दीपक तंटक यांच्यासह शहरातील शेकडो कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्या आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. पुण्याचे राजस्थानी आचारी नारायण महाराज हे आपल्या २५० सहकाऱ्यांच्या मदतीने अहोरात्र खपून शिवभक्तांसाठी हे भोजन तयार करत आहेत.
मायेचा घास आणि सुसज्ज व्यवस्था – पी. आर. धारिवाल फाऊंडेशन आणि श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी आपल्या मातोश्री दिवंगत कमलबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही ‘माता कमला की रसोई’ उभी केली आहे. येथे येणाऱ्या हजारो शिवभक्तांचे केवळ पोटच भरत नाही, तर मायेचा घास भरविला जात असल्याने मनही तृप्त होत आहे. एकावेळी तीन हजार जण बसू शकतील अशा हवेशीर आणि सुसज्ज प्रसादालयात दररोज पाच ते सहा हजार भाविक भोजनाचा लाभ घेत होते, मात्र आज ही संख्या १० हजारांच्या पार गेली. तरीही अन्नाचा तुटवडा भासू न देता हा अन्नदानाचा यज्ञ अखंडित सुरू आहे.
सर्वधर्मसमभावाचा आदर्श: रोजा असूनही मुस्लिम बांधवांची सेवा – या सोहळ्याचे सर्वात लक्षवेधी आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकोपा. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून अनेक बांधव उपवास (रोजा) करत आहेत. अशा परिस्थितीतही खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष मुश्ताक शेख, अल मदद बैतुल माल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी नगरसेवक आबीद शेख, राहिल शेख, असिफ शेख, हाफीज बागवान, कलिम सय्यद, तन्वीर शेख आदींनी प्रसादालयात येऊन शिवभक्तांना भोजन वाढण्याचे कार्य केले. श्रद्धेच्या या मंडपात माणुसकीचा धर्म अधिक उजळून निघाला.
