महाविकास आघाडीचे भव्य शक्तीप्रदर्शन
शिरूर (ता. शिरूर) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी शिरूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय सातव, सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह हजारो समर्थक, नागरिक,महिला भगिनी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केला.
जोरदार शक्तिप्रदर्शन – उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शिरूर बाजार समिती परिसरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी “शरद पवार जिंदाबाद,” “उद्धव ठाकरे जिंदाबाद,” आणि “राहुल गांधी जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महिला भगिनिंसह तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग – महिलांचा, तरुणांचा, आणि वृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळालेल्या या रॅलीत शिरूर आणि हवेली तालुक्याचे नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शक्तीप्रदर्शनातून अशोक पवार यांच्या रॅलीत हवेली व शिरूर तालुक्यातील अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला.
ॲड. अशोक पवार यांनी सांगितले की, “शिरूर आणि हवेलीच्या जनतेच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली आहे. विकास हेच आमचे ध्येय आहे आणि यापुढेही तेच राहील. केलेली विकास कामे, सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,कामगार,महिला भगिनी यांचा आशीर्वाद तर तरुणाईचा भक्कम पाठिंबा या बळावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत मी शेतकरी, कामगार, महिलावर्ग आणि सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाने उतरलो आहे,” असे सांगत पवार यांनी आपल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त केला.