करुणा मुंडेंच्या पुढाकाराने साडे नऊशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली नोकरी

स्वराज्य टाईम्स न्यूज

स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून ऊस तोड व इतर काबाड कष्ट करणारे हात आता करणार सन्मानाची नोकरी

बीड – सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावामुळे काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना आता सन्मानाने जीवन जगता येणार आहे.

बीड जिल्ह्यातील सुशिक्षीत तरुणांनी रोजगाराच्या शोधात प्रसंगी ऊसतोडीचे काम केले. मात्र करुणा मुंडेंच्या स्वराज्य शक्ती सेनेने मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या सहभागाने रोजगाराच्या संधी निर्माण करून जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना नवी दिशा दिली आहे.

    उच्च शिक्षण घेतलेले असूनही हाताला काम नाही, इच्छाशक्ती असूनही कुटुंबियांना हातभार लावता येत नाही, प्रसंगी ऊसतोड करण्यासाठी हातात कोयता घ्यावा लागतो,काबाड कष्ट करावे लागतात तेंव्हा कुठे हाता तोंडाचा मेळ बसतो अशा स्थितीत करुणा धनंजय मुंढे यांनी बीड जिल्ह्यातील साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगार तरुण व तरुणींना  रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून  रोजगार देण्याचे काम करत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

  बीड जिल्ह्यात कंपन्या अल्प प्रमाणात असल्याने सुशिक्षीत तरूणांना प्रसंगी उदरनिर्वाहासाठी  हाती कोयता घ्यावा लागायचा उच्च शिक्षण असूनही ऊसतोड करत ,काबाड कष्ट करत प्रपंचाचा गाडा हाकावा लागायचा. व्यसनाधीनता,कौटुंबिक वाद, काबाड कष्ट आणि अल्प उत्पन्न,पाचवीला पुजलेली गरिबी यातच पिढ्यानपिढ्या अडकून पडल्याची खंत आणि उच्च शिक्षण घेऊनही दर्जेदार नोकरी न मिळाल्याने दुःख, वैफल्य, निराशा तर व्यसनाधीनता  तरुणाई मध्ये दिसत होती.

मात्र स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तरूणाईच्या हाताला काम लागावे व  जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडें यांच्या माध्यमातून  मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मुलाखतीच्या माध्यमातून विविध ठिकाणी तरूणांना रोजगारांच्या नियुक्तीचे पत्र देवून निवड केल्यामुळे नामांकित कंपन्यांमध्ये साडे नऊशे सुशिक्षित तरुण व तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून या मेळाव्यात अनेकांना जॉइनिंग लेटर करुणा मुंढे यांच्या हस्ते देण्यात आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त करत करुणा मुंढे यांचे आभार मानले.

तरूणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न- करुणा मुंडे बीड जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व जीवनाला योग्य मार्ग मिळावा यासाठी विविध जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांना आमंत्रित करत महा रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यातून जिल्ह्यातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न करत हाताला काम दिले असून बीड जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती व्हावी व सुशिक्षित तरुणाई ला रोजगार हाच कुटुंबाला खरा आधार असल्याचे करुणा मुंढे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!