बारामतीच्याबारामतीच्या माळरानावर पडलेली कागदपत्रे अजित दादांच्या कामाची साक्ष देतात तर लाडक्या बहिणींचा हक्काचा दादा हरवला तर राजकारणातील आमचा आधारवड दादा हिरावले आहे – प्रदिप वसंतराव कंद
लोणीकंद (ता.हवेली): “घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज नियतीच्या काट्याने आमच्यातून हिरावून नेला…” अशा शब्दांत शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यासह लोणीकंद पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकच टाहो फोडला. यावेळी अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे जिल्ह्याच्या रिंग रोडला ‘अजित अनंतराव पवार’ यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी पेरण्याचे माजी उपसरपंच रवींद्र वाळके यांनी केली.

राजकारणातील आमचा ‘बाप’ हरवला: प्रदीप वसंतराव कंद
जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप वसंतराव कंद यांनी भावनिक झाले होते. त्यांनी अश्रुपूर्ण नयनांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “आज राजकारणातील आमचा ‘बाप’ आणि लाडक्या बहिणींचा भाऊ हरवला आहे. पुरुषाला सहजासहजी रडता येत नाही, पण जेव्हा कुटुंबातले दुःख असते तेव्हा डोळ्यांचा बांध फुटतो. आज माझी आणि माझ्या कुटुंबाचीही तीच अवस्था आहे. २८ फेब्रुवारीला माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि नेमक्या २८ जानेवारीला दादा सोडून गेले, हे दुःख न सोसणारे आहे. दादांनी मरणाच्या दारातही हातातील घड्याळ सोडले नाही, ते शेवटच्या श्वासापर्यंत कामात मग्न राहिले. बारामतीच्या माळरानावर विखुरलेली कागदपत्रे त्यांच्या कामाची साक्ष देतात. आता आपणच ‘अजित दादा’ होऊन जनतेची कामे मार्गी लावायची आहेत. आम्ही कामाच्या माणसाची कामाची माणसे आहोत कामच करून दाखवणार हा संस्कार आम्हाला अजित दादांनी दिल आहे.” यावेळी दादांच्या निधनामुळे प्रचार सभेचे रूपांतर शोकसभेत झाले असून, प्रचाराच्या गाड्या आणि संवाद मेळावे शांत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेहमी ‘माझी बारामती’ म्हणणाऱ्या दादांचा श्वास तेथेच थांबला: लोचन शिवले
पंचायत समिती गणाच्या उमेदवार लोचन शिवले या प्रसंगी अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, “बारामती हा दादांचा जीव की प्राण होता, ‘नेहमी माझी बारामती’ म्हणणाऱ्या दादांनी अखेरचा श्वासही तेथेच घेतला. सकाळी लवकर कामाला सुरुवात करणारे अजित दादा म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला मोठा निधी देऊन स्मारक भव्यदिव्य व्हावे, तसेच तुळापूर, वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा जयस्तंभाचा विकास व्हावा, हा त्यांचा ध्यास होता. घड्याळाची वेळ कधीही न चुकवणाऱ्या दादांची वेळ आज नियतीनेच चुकवली. पंधरा वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्तीला न्याय देण्यासाठी त्यांनी जाता-जाता पदरात उमेदवारी टाकली. दादा आमच्या कुटुंबाचा आधार होते.”

यावेळी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील अनेक मान्यवर ,राष्ट्रवादीसार्व पक्षाचे नेते कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.
मेणबत्त्यांच्या प्रकाशात दाटला दुःखाचा उमाळा : श्रद्धांजली सभेनंतर लोणीकंदमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला भगिनी हातात मेणबत्त्या घेऊन पुढे चालत होत्या, तर त्यांच्या मागे दादांच्या आठवणीत व्याकुळ झालेला जनसमुदाय होता. सर्वत्र काळोख असताना केवळ मेणबत्त्यांच्या उजेडात दादांचा फोटो आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख स्पष्ट दिसत होते. तुळापूर फाट्यावर सामूहिक पसायदान म्हणून या श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता झाली.

