बकोरी (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लोणीकंद–बकोरी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार पै. किरण संपतराव साकोरे, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी वाड्या-वस्त्यांवर घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे.
रविवारचा मुहूर्त, प्रचाराची कसोटी : रविवारची सुटी साधत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन उमेदवारांकडून करण्यात आले होते. वेळेचे काटेकोर नियोजन करत वाड्या-वस्त्यांवरील मतदारांशी भेटीगाठी घेण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार दौरा शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पडला. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून विकासकामांची माहिती देणे, नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत संवाद साधणे, यावर भर देण्यात आला.
‘प्रदीप विद्याधर कंद पॅटर्न’चा प्रभाव : पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा व दांडग्या जनसंपर्काचा ठसा मतदारांमध्ये दिसून येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधांबाबत झालेल्या कामांमुळे भाजपप्रती जनतेचा विश्वास वाढलेला दिसतो. गावोगावी असलेल्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि संघटित प्रचार यामुळे या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महिला आणि युवा वर्गाकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
मोनिका कंद आणि राणी वाळके यांनीही महिलांचे सक्षमीकरण, स्थानिक प्रश्नांची तातडीने सोडवणूक आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
“लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. प्रदीप दादा कंद यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.” – उमेदवार पै.किरण साकोरे, भाजप,पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गट
महिला व युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रचार दौऱ्यात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. बकोरी परिसरात भाजपच्या घरोघरी प्रचारामुळे निवडणूक वातावरण चांगलेच रंगले आहे.
