किरण साकोरेंच्या सेवाभावी यात्रेतून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ 

Swarajyatimesnews

धूप, दीप आणि भक्तीचा महासंगम, वाराणसीतील गंगा आरतीचा पेरणे लोणीकंद गटातील भाविक भक्तांनि घेतला स्वर्गीय अनुभव

वाराणसी, ७ नोव्हेंबर : वाराणसीच्या पवित्र घाटावर संध्याकाळचा काळोख उतरू लागला तसा गंगेच्या लहरींवर हजारो दिव्यांचा प्रकाश नाचू लागला. शंखध्वनी, घंटानाद आणि मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण पवित्रतेने भारून गेले. त्या दिव्य क्षणी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखाली माता गंगेच्या आरतीचा आणि काशी विश्वेश्वरांच्या दर्शनाचा दिव्य अनुभव घेतला.यात्रेतील पै. किरण साकोरे यांच्या सेवाभावी वृत्तीने भाविक भक्तांच्या हृदयात अढळ स्थान मिळवत त्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन व दशाश्वमेध घाटावरील अभूतपूर्त गंगा आरतीने भाविक मंत्रमुग्ध झाल्याने यात्रेला श्रद्धा, भक्ती, समर्पण, एकरूपता व सेवा अशी मांगल्याची अनुभूती लाभली.

    ही यात्रा भक्तीची, श्रद्धेची ,सेवेची आणि लोणीकंद पेरणे गटाच्या विकासाच्या संकल्पाचे पहिले भक्तिमय वारसा घेऊन सर्वांगीण विकासाचे पहिले पाऊल ठरले असून जिल्हा . पै. किरण साकोरे व त्यांच्या सहधर्मचारिणी यांच्या हस्ते पार पडलेली गंगा आरती म्हणजे भक्तिभावाचा महासागरच होता! हजारो भाविकांच्या ओठांवर “हर हर गंगे, हर हर महादेव!” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.भक्तांच्या ओंजळीतून पवित्र अर्घ्य गंगेच्या प्रवाहात मिसळत होते. ते होते समाधानाचे, परमेश्वराशी झालेल्या संवादाचे. काशी विश्वेश्वरांच्या मंदिरात दर्शन घेताना प्रत्येक यात्रेकरूच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज झळकत होते.

या यात्रेला शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, कुस्तीगीर संघाचे पै. संदीप भोंडवे, कारखान्याचे संचालक सुभाष जगताप, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, संजीवनी कापरे या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन लाभले.

किरण साकोरे मित्र परिवाराच्या सेवेने भाविक प्रभावित –  “काशी कोटि कोटि तीर्थ सम, काशी सारे जगन्मय”  या संतवाणीला सार्थक करणारा दिव्य अनुभव यात्रेकरूंना लाभला. पुण्याहून वाराणसी पर्यंतच्या रेल्वे प्रवासापासून ते काशीतील वास्तव्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली.

   पुणे येथून वाराणसीपर्यंतच्या रेल्वे प्रवासात  प्रदीप दादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार, स्वयंसेवक  आणि कार्यकर्त्यांनी कोणालाही काहीही कमी पडू दिले नाही. भोजन, निवास, आरोग्य आणि अन्य सेवा व्यवस्थेची उत्तम सोय करण्यात आली होती, ज्यामुळे यात्रेकरूंना केवळ भक्तीचा अनुभव घेता आला.

यात्रेत सहभागी झालेले भाविक या आयोजनाने अत्यंत प्रभावित झालेले दिसले. यात्रेकरूंनी सांगितले, “असे सुव्यवस्थित आयोजन आम्हाला यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. प्रत्येक यात्रेकरूची काळजी घेण्यात आली आणि आम्हाला निवांतपणे दर्शनाची संधी मिळाली.”

 

दशाश्वमेध घाटावर भक्तीचा अभूतपूर्व संगम –  दशाश्वमेध घाटावर संध्याकाळी पार पडलेल्या गंगा आरतीने सर्व यात्रेकरू भावविभोर झाले. घंटानाद, शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले. पै. किरण साकोरे व त्यांच्या सहधर्मिणी यांच्या हस्ते गंगा आरती पार पडली, ज्यामुळे यात्रेकरूंमध्ये भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण अधिक वाढले.

“काशी विश्वेश्वरांच्या व यात्रेकरूंच्या आशीर्वादाने माझ्या शरीरात व मनात नवी ऊर्जा आणि चेतना निर्माण झाली आहे. लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात समाजकार्यातून जनतेची सेवा करायची, तसेच गटाचा सर्वांगीण विकास करायची हीच आमची महत्त्वाची भूमिका आहे. या देवदर्शन यात्रेतून भक्तीच्या मार्गावरील आम्ही प्रथम पाऊल टाकले असून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे.” – पै. किरण संपतराव साकोरे 

काशी विश्वनाथ दर्शनानंतर आता या यात्रेकरूंचा पुढचा प्रवास अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी सुरू झाला आहे. संपूर्ण यात्रेदरम्यान सेवाभाव, भक्तिभाव आणि एकात्मतेचा जो संदेश देण्यात आला, तो इतरांसाठी उदाहरण ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!