कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय

Swarajyatimesnews

डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात पोलिसांच्या  नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला तर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिका तसेच प्रवासी, कामगार यांना आता वाजले की बारा म्हणायची वेळ आली तर भरीस भर म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतिच्या पुणे नगर महामार्गावरील स्ट्रीट लाइट काहीकाळ बंद असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गोंगाटामुळे जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला.

देखावे, डीजे सिस्टीम बाहेरच्या मार्गाने – काही मंडळांनी डीजे सिस्टम,देखावे गावातून मिरवणूक मार्गात बसणार नसल्याने बाहेरच्या मार्गाने आणले, ज्यामुळे वाहतूक अडथळ्यात आणखी वाढ झाली. पुणे-नगर महामार्ग, वढू रोड आणि गणेशभवन परिसरातील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती.

भांबावलेली पोलिस यंत्रणा आणि वाहतूक कोंडीत अडकलेली ॲम्बुलन्स  –  या सर्वात गंभीर घटना म्हणजे वाहतूक कोंडीत  पाच – सहा रुग्णवाहिका अडकून पडल्या.  पोलिसांच्या नियोजनावर आणि वाहतूक व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रांगा व्यवस्थित लावता आल्या नाहीत की ट्रॅफिक नियोजन करता आली नाही त्यामुळे भांबावलेली पोलिस यंत्रणा दिसली. पोलिस कर्मचाऱ्यांनी श्रमपूर्वक प्रयत्न केले, पण नियोजनाच्या अभावामुळे त्यांनाही धावपळच करावी लागली.

‘आप्पाचा नाद नाय’चा जल्लोष – मिरवणुकीतील सर्वात चर्चित प्रसंग होता ‘आप्पाचा नाद नाय’ या गाण्यावर तरुणाईचा जल्लोष. माजी सरपंच अमोल गव्हाणे (आप्पा) यांना खांद्यावर घेऊन तरुणांनी केलेल्या डीजे वर उत्साहाच्या वातावरणात जल्लोषात नृत्य केले. पण या गाण्याची व माजी सरपंच अमोल गव्हाणे यांची चर्चा पहायला मिळाली.

जय महाकाल ने नागरिकांना केले मंत्रमुग्ध – अखिल फडतरे वस्ती मंडळाच्या वतीने सादर केलेला ‘जय महाकाल’ हा जिवंत देखावा , यामध्ये भस्माची उधळण करत रौद्र रूप धारण केलेले विक्राळ रुपातील शंभो महादेव त्यांच्या मुखातून निघालेला अग्नी पाच ते सात फूट उंचींचा तर ज्यातून निघणारी ज्वाला, सोबत वाजणारे वाद्य तसेच महाबली हनुमान यांच्या पारंपरिक पोशाखातील कलाकार त्यामागे डिजिटल स्क्रीन, शंकराची मोठी मूर्ती, तसेच त्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली, आदर्श मित्र मंडळाचा आदियोगी शंकराची मूर्ती, संगम मित्र मंडळाच्या ‘रौद्रशंभो ढोल ताशा पथक’ , तसेच इतर ढोल ताशा पथक यांनी पारंपरिक वाद्यांची छाप कायम ठेवली. ग्रामपंचायतीने विसर्जन घाटावर चांगली व्यवस्था केली होती व डिजिटल स्क्रीनचा नवीन ट्रेंडही दिसला.

उत्साह आणि गोंधळ यांच्या द्वंद्वात कोरेगाव भीमाची ही विसर्जन मिरवणूक झाली. तरुणांच्या ऊर्जेने भरलेली ही मिरवणूक जशी आनंददायी होती, तशीच नियमांची उपेक्षा, वाहतूक व्यवस्थेची बिकट स्थिती आणि सामान्य नागरिकांना झालेला त्रास यामुळे चिंताजनकही ठरली.

या मिरवणुकीस पोलिस निरिक्षक गायकवाड , सहाय्यक  पोलिस निरीक्षक देशमुख, साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, मांजरे,कचरे, महेश डोंगरे, पोलिस हवालदार संदीप कारंडे, श्रावण गुपचे,नवनाथ नायकुडे, सरोदे, पाटील, भालेराव, निकम सरोदे, निंबोळे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विसर्जन कोरेगाव भीमा ग्रामपंचायत सरपंच संदीप ढेरंगे,, सदस्य, पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ यांच्यासह क्लार्क सुजाता गव्हाणे,सागर गव्हाणे, विनोद दौंडकर, नीलिमा माकर, ग्रामपंचायत शिपाई आनंदा पवार, मच्छिंद्र डफळ,तसेच नदीवर बोटीमध्ये विसर्जन करण्यासाठी सोनू भोकरे, अण्णा बढे यांनी महत्वाचे योगदान दिले.

यावेळी क्रांती युवा मंच, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, नरेश्वर तरुण मंडळ, वक्रतुंड मित्र मंडळ, ,अखिल ढेरंगे वस्ती जनसेवा तरुण मंडळ व जय हनुमान प्रतिष्ठान, नवनाथ तरुण मित्र मंडळ,अखिल फडतरे वस्तीचा राजा, अचानक तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, सुवर्णयुग तरूण मंडळ, आदर्श प्रतिष्ठान मंडळ, संगम तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ , गजानन तरुण मंडळ, युवाशक्ती तरुण मंडळ,, ५०० बॉईज कोरेगाव भीमा मित्र मंडळ,  आनंद नगर, वाघेश्वर प्रतिष्ठान ,अखिल गणेश नगर मित्र मंडळानेही  उत्साहात गणेश विसर्जन केले. यावेळी परिसरातील नागरीकांनी विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी गर्दी केली होती.  

डिजिटल स्क्रीनचा वापर – गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सरपंच संदीप ढेरंगे यांनी केलेली विकास कामे, पाण्याच्या टाकीसाठी वनखात्याची मिळवलेली जमीन, नरेश्वर तळ्याचे गाळ उपसा व खोलीकरण, दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजा रोहन प्रसंगी उपस्थिती बाबत व्हिडिओ व फोटो लावण्यात आले तर माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य अनिकेत गव्हाणे यांचीही स्क्रीन, मारुती मंदिर येथे स्क्रीन, मारुती भांडवलकर स्मारक येथे स्क्रीन, गव्हाणे तालीम येथे स्क्रीन लावून भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!