प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील निसर्गसौंदर्याला कचऱ्यामुळे बाधा होत होती. ही बाब ग्रामस्थ विजय ढमढेरे यांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच कार्यवाही करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामविकास फाऊंडेशनने खंडोबा मंदिर परिसर व स्मशानभूमी भागात वृक्षलागवड करून निसर्गसंपन्न वातावरण निर्माण केले आहे. मंदिर प्रांगणात फुलझाडे, पावसाळ्यात प्रवाही होणारा तलावाचा धबधबा आणि मुलांसाठी घसरगुंडी, झोके, बाके यामुळे खंडोबा गड पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे कोंढापुरी गावाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गावाच्या सौंदर्यात बाधा आणणारा कचरा दूर करून रस्ता स्वच्छ केल्याबद्दल विजय ढमढेरे व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. “स्मार्टग्राम” उपक्रमात गावाचा सहभाग कायम राखण्यासाठी अशा स्वच्छता मोहिमा आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.