डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागील २५ वर्षे शिरूर-हवेली दिंडीचे पायी वारी करून त्यांनी वारकरी संप्रदायावरील आपली अढळ श्रद्धा आणि निष्ठेचे दर्शन घडवले होते. पंढरीच्या वाटेवरचे ते एक खरे ‘वारकरी’ होते, ज्यांनी संत परंपरेचा अनमोल वारसा आयुष्यभर जपला आणि तो पुढील पिढीकडे हस्तांतरित केला.
गव्हाणे कुटुंब हे ३० जणांचे एकत्रित कुटुंबाचे प्रमुख होते या मोठ्या कुटुंबाचे शांताराम गव्हाणे हे केवळ प्रमुखच नव्हते, तर ते एक प्रेमळ, संयमी आणि दूरदृष्टीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या हसतमुख आणि मृदुभाषी स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सर्व मुले आणि मुली उच्चशिक्षित होऊन डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत, हे त्यांच्या कुटुंबवत्सल स्वभावाचे आणि दूरदृष्टीचे द्योतक आहे.
व्यवसायाच्या क्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांच्या अथक परिश्रमातूनच दुग्ध व्यवसायातील ‘ज्ञानेश्वरी दूध डेअरी’ आणि वैद्यकीय क्षेत्रातील ‘श्रीकृष्ण मेडिकल्स’ यांचा यशस्वी विस्तार झाला. ऊस बागायतदार म्हणूनही त्यांचे नाव पंचक्रोशीत आदराने घेतले जात असे, जे त्यांच्या कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट बागायतदार म्हणून नावलौकिक मिळवला होता.
त्यांच्या पश्चात रमेश गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, रामदास गव्हाणे हे बंधू; तर मुलगा ग्राम पंचायत सदस्य प्रसाद शांताराम गव्हाणे, मुलगा प्रतीक शांताराम गव्हाणे, पुतणे प्रकाश गव्हाणे, हेमंत गव्हाणे, सिद्धार्थ गव्हाणे, अनिश गव्हाणे, वेदांत गव्हाणे, परिक्षित गव्हाणे आणि डॉ.संयोगिता रामदास गव्हाणे असा मोठा परिवार आहे.
कै शांताराम गव्हाणे यांच्या जाण्याने एक अनुभवी, विचारशील, कर्तृत्ववान आणि माणुसकी जपणाऱ्या पिढीतील आधारस्तंभ हरपल्याची भावना परिसरात व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा दशक्रिया विधी २५ जुलै डिंग्रजवाडी येथील भिमा नदी किनारी होणार असून यावेळी गुरूवर्य ह.भ. प. सुमंत बापू हंबीर यांचे प्रवचन होणार आहे.