मांडवगण फराटा येथे डंपर-पिकअप अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी

swarajyatimesnews

मांडवगण फराटा (ता.शिरूर) गावात डंपर आणि पिकअप जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

प्राप्त माहितीनुसार, मांडवगण फराटा येथून वडगाव रासाईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (MH 42 SEQ 7696) समोरून येणाऱ्या पिकअप जीपला (MH 03 OE 0638) जोरदार धडक दिली. डंपर चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवले असल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या भीषण धडकेत सागर संभाजी कोळपे (वय २८, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय १२, मूळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल बीरा कोळपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, शिरूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून पोलिस निरीक्षक  संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई नकाते करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!