पुणे – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली आहे.
बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
यानुसार पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि चाकण पोलीस ठाण्याचे पथक अशी दोन पथक दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचून केंदूर घाटात थांबले होते. दरोडेखोर येताच त्यांना पकडण्यासाठी पोलीस पुढे आले. दरोडेखोर आणि पोलीस समोरासमोर आले. त्यांच्यात झटापट झाली. दरोडेखोरांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्यात पोलीसच उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले. स्वसंरक्षणासाठी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दरोडेखोराच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या, पैकी एक लागली. यात दरोडेखोर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दरोडेखोराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार, यापूर्वी ९ गुन्हे दाखल –
बहुळ येथील दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे पोलिसांच्या रडारवर होते. ते पुन्हा दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. सचिन भोसले हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.