राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू यावेळी उपस्थित होते. तर जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नगर रचना संचालक पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, पहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन त्याच्या नोंदी तयार केल्या जातील. यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळू शकेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या क्षेत्राच्या विकासाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल. यासाठी सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प स्वरुपात काही गावठाणांचा विस्तार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.