दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं’
‘त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे’ असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
मित्राला केला फोन त्यानंतर केला गुन्हा दाखल – गुन्हा केल्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी मुलगी उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. मित्राच्या सल्ल्यावरुन तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच आम्ही कारवाई सुरु केली’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर मधील दत्तात्रय गाडे हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दत्ता गाडे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. धमकी देणं, चेन स्नॅचींग यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत.शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध घेतला जात आहे. तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे.