नागपूर – नंदनवन येथे एका व्यावसायिक युवकाने झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला तसेच मुलावरही वार केला. मात्र, दुसऱ्या मुलाने शेजाऱ्यांना आवाज दिल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर युवकाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. जखमी महिलेचे नाव पिंकी नांदूरकर (३२, बगडगंज) असून आरोपी रवी नांदूरकर आहे. आठवडाभरापूर्वी त्याने गांधीबागमधून चाकू विकत घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून तणावात असलेल्या रवीने पत्नी व मुलांचा खून करून आत्महत्या करण्याचा कट रचला होता.
रविवारी रात्री जेवणानंतर सर्व झोपले असताना पहाटे रवीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. मोठ्या मुलावरही वार केला, मात्र त्याने प्रतिकार केला. दुसऱ्या मुलाच्या आरडाओरडीनंतर शेजारी धावत आले. त्यांनी रवीला पकडले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिघांनाही मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून पिंकी यांची प्रकृती चिंताजनक आहे.नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.