सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्नेहलने अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्नेहल ही लहानपणापासून अभ्यासात प्राविण्य मिळवणारी विद्यार्थीनी आहे. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सणसवाडी येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण कर्वेनगरमध्ये झाले. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण करून, स्नेहलने खासगी ऑनलाइन क्लासेस आणि स्वयंअध्ययनाच्या आधारावर सीए परीक्षेची तयारी केली.
स्नेहलचे वडील अरुण हिरे सणसवाडीत एका खासगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत असून, आई मनिषा गृहिणी आहेत. स्नेहलच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह मित्रपरिवार, नातेवाईक, आणि स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
स्नेहलने खडतर परिश्रमाने सीए होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करून अनेकांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.