शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत.
दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड, कडेठाण आणि बोरीपार्धी या गावांमध्ये बिबट्यांचे वावर वाढले आहे. वाड्यांवर आणि शेतात बिबट्यांचे सर्रास दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी बोरीपार्धी गावच्या हद्दीत बिबट्याने एका चिमुकल्यावर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. त्या घटनेनंतर वन विभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केले, मात्र बिबट्यांची समस्या अद्याप कायम आहे.
रेल्वे अपघाताने उघडकीस आलेली समस्या – रविवारी पहाटे यवतजवळ रेल्वे मार्ग ओलांडताना एका बिबट्याला रेल्वेची धडक बसली. या दुर्घटनेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या भागातील शेतकरी आणि शेतमजूर या घटनांमुळे भयभीत झाले असून, दिवसा शेतात जाण्याचे धाडस करत नाहीत.
वन विभागाकडे ठोस उपाययोजनांची करण्याची मागणी – परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी, आणि लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी होत आहे.