विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं आहे.यंदाच्या निवडणुकीतील शरद पवारांची ही सांगता सभा आहे.
बारामतीत शरद पवारांच्या पक्षाने सांगता सभेची जोरदार तयारी केली . या सभेला पक्षातील अनेक नेते, आमदार, खासदार उपस्थित आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील या सभेला उपस्थित होत्या. यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातातील एका फलकाने सर्वांच लक्ष वेधलं आहे.
बारामतीमधील प्रचारसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेला फलक प्रतिभा पवारांनी आपल्या हाती घेतला. या फलकावर लिहिलेल्या मथळ्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, असा मथळा त्या फलकावर लिहिला आहे. एका कार्यकर्त्याने बनवून आणलेला हा फलक प्रतिभा पवार यांनी त्यांच्या हातात घेऊन उंचावला.
शरद पवारांकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचार – ८५ वर्षीय शरद पवार हे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. शरद पवार कधी शेतकऱ्यांच्या बांधावर, तर कधी गावच्या पारावर दिसतात. ते कधी प्रचारसभेत, तर कधी प्रचारफेरीत सहभागी होत आहेत. लहान-मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन सामान्य जनतेशी संपर्क साधत आहेत. त्यांचा हा कामाचा व्याप पाहून त्यांच्या विरोधकांनाही धडकी भरली आहे. याच गोष्टीला अनुसरून बनवलेला हा फलक प्रतिभा पवार यांना भावला. म्हणूनच त्यांनी तो फलक आपल्या हाती घेतला व सर्वांना दाखवला. बारामतीत या फलकाची चर्चा आहे.शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात सभांचा जो काही धडाका लावलाय त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची उर्जा निर्माण झाल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा लागली आहे. बारामतीमधील ही लढाई ही आता राजकीय उरली नसून ती कुटुंबात पडलेली फूट असल्याचं उघड दिसत आहे.