गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये 
पत्नीने केला पतुविरिद्ध गुन्हा दाखल
पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले.
यासह एकूण तीन कोटी ७४ लाख ७९ हजार ८४७ रुपयांचा अपहार केल्याबाबत पत्नीने गुन्हा दाखल केला असून सदर प्रकार १ एप्रिल २०२३ ते १५ मे २०२४ या कालावधीत महाळुंगे इंगळे येथे घडला.
हनुमंत रावसाहेब पोटे (वय ३१, रा. चिंबळी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी ३१वर्षीय पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नात्याने पती-पत्नी आहेत. फिर्यादी यांच्या नावे असलेल्या ममता गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहण्याची मुभा घरजावई असलेले पती हनुमंत यांना दिली होती. हा व्यवहार पाहत असताना ग्राहकांकडून आलेले पैसे हनुमंत यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना करीना राज व मुस्कान यांना दिले. १० लाख रुपयांचे सोने खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून दिली. यासह एकूण तीन कोटी ७४ लाख ७९ हजार ८४७ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
