श्रेष्ठींकडे आग्रही मागणीने स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण
पुणे प्रतिनिधी : विजय लोखंडे
दि. ३० जुलै २०२५: पूर्व हवेली तालुक्यातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे वाडेबोल्हाई गाव राजकारणातही उजवे ठरत असून आता जिल्हा परिषदेच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते कुशाभाऊ गावडे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वाडेबोल्हाईला उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. वाडेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या भूमिपूजन आणि इतर विकासकामांच्या शुभारंभावेळी आयोजित सभेत गावडे बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप आणि सरपंच वैशाली केसवड यांच्यासारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या व्यासपीठावरून गावडे यांनी आपली राजकीय इच्छा जाहीरपणे मांडली.
वाडे बोल्हाई गावाला उमेदवारी मिळावी – गेल्या अनेक वर्षांपासून वाडेबोल्हाई हे पेरणे-वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटाचा अविभाज्य भाग राहिले आहे. या गावाने जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र, खेदाची बाब म्हणजे, आजवर या गावाला स्वतःची जिल्हा परिषद उमेदवारी मिळालेली नाही. आता नवीन गट रचनेच्या पार्श्वभूमीवर, गावडे यांनी ही मागणी उचलून धरली आहे. “गट रचना कोणतीही असो, यावेळी वाडेबोल्हाईचा विचार करून आमच्या गावाला उमेदवारी मिळायलाच हवी,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
गावच्या विकासात नेत्यांचे योगदान – गावडे यांनी यावेळी सरपंच वैशाली केसवड आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या विकास कामांचे कौतुक केले. आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळतील, याचा त्यांना आनंद आहे. प्रदीपदादा कंद आणि सुभाषआप्पा जगताप यांनी आजवर गावासाठी दिलेल्या भरीव निधीचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. आता आमदार माऊली आबा कटके यांच्या माध्यमातूनही वाडेबोल्हाईच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बोल्हाई मंदिर आणि राजकीय रणधुमाळी – विशेष म्हणजे, आई बोल्हाई देवीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या या मंदिरातच मागील अनेक जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रचार सभांचा शुभारंभ आणि समारोप झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी येथे सभा घेतल्या आहेत आणि या सभांमधूनच अनेक जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही वाडेबोल्हाईची प्रमुख भूमिका असणार हे निश्चित.
या पार्श्वभूमीवर, “यावेळी तरी पक्षश्रेष्ठींकडून श्री क्षेत्र वाडेबोल्हाई गावचा विचार होऊन, आई बोल्हाई देवीच्या कृपेने गावाला जिल्हा परिषद सदस्य पदाची उमेदवारी मिळणार का?” असा कळीचा प्रश्न आता वाडेबोल्हाई आणि परिसरात चर्चिला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठी गावडे यांच्या मागणीची दखल घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.