वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

Swarajyatimesnews

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वाघोलीतील वाघेश्वर नगर भागात मध्यरात्री घडली.

याबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे  वडिल वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गोरे वस्तीतील पेटकर यांचे घरासमोर २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.याप्रकरणी आरोपी नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली) यांना ताब्यात घेतले आहे. गणेश वाघु धांडे (वय १७, रा. गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

नेमकी घटना काय आहे –  मिलेलेल्या माहितीनुसार गणेश तांडे याची लक्ष्मण पेटकर यांच्या मुलीसोबत मैत्री होती. तो पेटकर यांच्या मुलीशी फोनवर व भेटून बोलत होता. दोघांची मैत्री लक्ष्मण पेटकर व त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती. त्यामुळे या रागातूनच गणेशच्या खुनाचा कट आरोपींनी रचला.

नवीन वर्षाच्या मध्यरात्री केली हत्या – गणेश हा मंगळवारी रात्री फिरायला निघाला. यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत होता. यावेळी आरोपी लक्ष्मण पेटकर, नितीन पेटकर व सुधीर पेटकर या तिघांनी गणेशला रस्त्यात गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला केला. आरोपींनी गणेशला जबर मारहाण केली. या सोबतच त्याची दगडाने ठेचून हत्या केली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते.

वाघोली पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी लक्ष्मण पेटकर यांना अटक केली असून नितीन व सुधीर पेटकर यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सदर घटनेचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक पंडित रेजितववाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!