ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
हवेली : दि. १७ ऑगस्ट , वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने मानवी वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल (दि.१७) मध्यरात्री बिबट्याने धावलदरा-गायकवाड वस्तीत गणपत बरकडे यांच्या कळपावर हल्ला करून घोडीचे शिंगरू ठार केले. याआधी आठवडाभरापूर्वी खुटाळी-बारांगनी वस्तीत शेतकरी गणेश गावडे यांच्या शेतातील संरक्षण भिंतीवरून झेप घेऊन पाच मेंढ्या ठार केल्या होत्या.

दोन्ही घटनांनंतर वनरक्षक बापूसाहेब बाजारे व पूजा कुबल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी माजी उपसरपंच विद्याधर गावडे, उद्योजक शाम गावडे, शेतकरी गणेश गावडे, गणपत बरकडे, माजी सरपंच बेबीताई चव्हाण, शेतकरी रमेश चव्हाण, मंगेश ढवळे, मारुती ठवरे, शेखर चव्हाण तसेच प्रभावित कुटुंबीय उपस्थित होते.
गावात दोन बिबटे वास्तव्य करत असल्याचे ग्रामस्थ सांगत असून हे बिबटे सतत मानवी वस्तीत येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. “गेल्या महिनाभरात अनेक प्राण्यांचा बळी गेला असून आता मानवी जीवितासही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी सरपंच वैशाली केसवड यांनी केली.
“परिस्थितीवर लक्ष ठेवले असून लवकरच गावात येऊन ग्रामस्थांना जनजागृतीचे प्रशिक्षण दिले जाईल. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ग्रामस्थांनीही काळजी घ्यावी,” असे पूर्व हवेलीचे वन अधिकारी प्रमोद रासकर यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे वाडेबोल्हाई गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांनी तातडीने पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.